ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 4 : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

■ झिका वायरसमुळे घाबरुन जाऊ नये

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये झिकाचा एक रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी आले आहे. या भागात डास उत्पतीचे ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहे. या आजाराचे संक्रमण झाले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना केल्या जात आहे. झिका वायरसमुळे घाबरुन जाऊ नये असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!