ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुवर्णकन्येचा सुवर्णकामगिरी…! राही सरनोबतने पटकावले विश्वकप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

नवी दिल्ली : मराठमोळ्या राही सरनोबतने नेमबाजी विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवले. तिने फ्रेंच आणि रशियन नेमबाजांना मागे टाकत सुवर्ण कामगिरी केली आहे.

राही सरनोबतने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जागतिक पातळीवर नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

भारताची आघाडीची नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याआधी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली होती. भारताची स्टार युवा नेमबाज मनू भाकरला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

राही सरनोबतने अंतिम फेरीच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेमध्ये अचूक नेम साधला. फ्रान्सच्या माथिलदे लमोल्लेने 31 गुणांसह रौप्यपदक जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत राहीने 591 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!