ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी पुण्यतिथी निमित्त वटवृक्ष देवस्थानचा पालखी सोहळा उत्साहात;पालखीचे रांगोळी आणि गुलाब पुष्पांनी स्वागत

अक्कलकोट, दि.१८ : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो भक्तगणांच्या सहभागाने या पालखी सोहळ्यात भक्तीचा सुगंध दरवळला होता. देवस्थानच्यावतीने सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस
प्रारंभ झाला. प्रारंभी चोळप्पा महाराजांचे वंशज देवस्थानचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता.
फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली,देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली. वटवृक्ष मंदिरात भजन, विडा,चौरी, आरती होऊन प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. स्वामी पुण्यतिथी निमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, प्रदीप झपके, विजय दास, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालखीचे रांगोळी अन
गुलाब पुष्पांनी स्वागत

पुण्यतीथी निमित्त संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले.यावेळी महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!