कोरोना उपाययोजनाबाबत उद्यापासून पालकमंत्री भरणे यांच्या तालुकास्तरीय बैठका; लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी करणार चर्चा
सोलापूर, दि. 22 : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात सर्वत्र लागू होती. त्यामुळे कोविडबाबत बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्याबाबत अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून मतदान झाल्यानंतर कोविड बाबत बैठका घेण्यास, उपाययोजना करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. या विनंतीचा विचार करून भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अशा बैठका घेण्यास परवानगी देणारे पत्र पाठवले आहे.
यानुसार पालकमंत्री श्री. भरणे उद्या, शुक्रवारपासून जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची पुढीलप्रमाणे आढावा बैठका घेणार आहेत.
(दिनांक, ठिकाण, वेळ यानुसार)
दिनांक :-23 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, अकलूज. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर. दुपारी 3 वाजता तहसील कार्यालय, मंगळवेढा. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती सांगोला.
दिनांक:- 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 वाजता पंचायत समिती, करमाळा. दुपारी 12 वाजता पंचायत समिती कुर्डूवाडी. दुपारी 3 वाजता नगरपालिका, बार्शी. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती, मोहोळ.
दिनांक:-25 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, अक्कलकोट. दुपारी 2 वाजता नियोजन भवन सोलापूर.