ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार

दिल्ली,दि.७ : केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे नेते नारायण राणे, कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांच्या नावे अधिक चर्चेत आहेत.

सात राज्यांच्या राज्यपाल बदलल्या नंतर मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जुलै रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास 17 ते 22 नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकतो असे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशमधून भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी दिल्लीतून फोन आल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला मध्यप्रदेश दौरा रद्दकरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

आगामी काळात विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांतील नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उत्तर प्रदेशातून तीन ते चार मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. बिहारमधूनही सुशील मोदी, ‘जेडीयू’चे आर. सी. पी. सिंह, लोक जनशक्ती पक्षाचे पशुपतिकुमार पारस यांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाखमधून प्रत्येकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या ५३ मंत्री असून, आणखी २८ जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात काही राज्यांवर अधिक लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!