ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, देशाचे शूरवीर जवान व  अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कारगिल विजय दिनाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य’…कारगिल संघर्ष’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, भारताला शांती हवी असली आहे. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाई तळ उभारण्यात आले आहेत. सन १९६२ मध्ये आपण विद्यार्थीदशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले पहिले, खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२ च्या युद्धात शहिद झाले, असे राज्यपालांनी सांगितले.

कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली असे सांगून डोकलाम व गलवान या ठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘अशक्य ते शक्य’ हे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्र विजेते हवालदार दिगेन्द्र सिंह, हवालदार दीप चंद, घातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वे, हवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण,  स्क्वाड्रन लीडर राहुल दुबे, कॅप्टन रुपेश कोहली, कॅप्टन विद्या रत्नपारखी, सविता दोंदे, कर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा सत्कार करण्यात आला.

लेखिका अनुराधा गोरे यांनी ‘अशक्य ते शक्य’ हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे दिनकर गांगल व सुदेश हिंगलासपुरकर यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, अनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्रसंचलन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!