ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुणे जिल्ह्यात आढळला झिका आजाराचा पहिला रुग्ण; रुग्ण पूर्णपणे झाला बरा

मुंबई : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

आज दिनांक ३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि  ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या.

★ काय आहे झिका आजार..

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात.  गर्भवती महिलेस हा आजार झाल्यास होणाऱ्या बाळाच्या डोक्याचा घेर कमी (मायक्रोसेफाली) असू शकतो. तथापी हे सप्रमाण सिद्ध झालेले नाही तरीही या दृष्टीने गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!