ध्यास विश्वसार्ह बातमीचा

किणी रोड वरील स्मशानभूमीतील बगीच्याला तूर्तास स्थगिती, पालिका पदाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

अक्कलकोट : पालिकेत दोन गटाच्या उपोषणावरून राजकारण पेटले असताना आज सायंकाळी मात्र या वादावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर पडदा टाकून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गटाचे उपोषण मागे घेण्यात आले. यात कोणाचीही भावना दुखावू नये यासाठी बगीच्याला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत एक महिन्यात विचार-विनिमय करून निर्णय घेण्यात येईल, यात सर्वांना विश्वासात घेतले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.त्यानंतर बगीचा हटाव समितीने यास होकार देत उपोषण मागे घेतले. १ कोटी ५५ लाखांच्या तीन कामापैकी बगीचा सोडून वॉल कंपाऊंड आणि वाचमन कॉर्टर ही दोन कामे मात्र या ठिकाणी होणार आहेत. ही जागा एकूण अडीच एकर आहे ती बागेसाठी आरक्षित आहे असे असले तरी हा भाग स्मशानभूमीसाठी राखीव ठेवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावर अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु याबाबत सर्व लोकप्रतिनिधी विचार करून निर्णय घेऊ, थोडा वेळ द्या असे सांगण्यात आले.

याबद्दल नगरसेवक बसलींगप्पा खेडगी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, पक्षनेते महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह नगरसेवक मंडळीने दोन्ही गटाशी सविस्तर चर्चा करून दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.तशाप्रकारचे लेखी हमी पत्र नगराध्यक्ष शोभा खेडगी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.  त्यानंतर सायंकाळी दोन्ही उपोषण मागे घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!