राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही – नवाब मलिक
मुंबई दि. १७ जुलै – नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या अटकली बांधल्या जात होत्या मात्र नवाब मलिक यांनी या अटकलींना पूर्णविराम आज दिला. राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. शिवाय विचारसरणी वेगळी आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
आजच्या घडीला किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आलेले आहे. ते व्यवस्थित काम करत असताना काही लोक तारीख पे तारीख देत मी पुन्हा येईन सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.