दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिपीन रावत यांचे निधन झाले. रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. त्याचवेळी रावत यांच्या निधनाने देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले संरक्षण दल प्रमुख पद रिक्त झाल्याने त्याजागी नवी नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद अधिक काळ रिक्त न ठेवता तातडीने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून पुढील काही दिवसांत देशाला नवा संरक्षण दल प्रमुख मिळेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. या पदासाठी देशाचे सध्याचे लष्करप्रमुख असलेले मराठमोळे अधिकारी जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे अशी माहिती समोर आली आहे.
सैन्यदलाचा प्रमुख निवडण्यासाठी जी प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया संरक्षण दल प्रमुख पदाच्या नियुक्तीसाठी असेल. सर्वप्रथम सरकार तिन्ही सैन्यदलांतील वरिष्ठ कमांडर्सची एक समिती बनवेल. ही समिती दोन ते तीन दिवसांत शिफारस करेल. त्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी मिळाल्यानंतर संभाव्य नावे विचारार्थ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठविली जातील. ही समितीच देशाचा पुढचा संरक्षण दल प्रमुख कोण असेल, यावर अंतिम निर्णय घेईल, असे या विषयातील जाणकारांचे म्हणणे आहे.