मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली.
बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021