मुंबई : निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना शिवसेना ‘’उद्धव बाळासाहेब ठाकरे’’ असे नाव आणि ‘’धगधगती मशाल’’ हे चिन्ह मिळाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाने आज सकाळीच इमेलद्वारे निवडणूक आयोगाला शंख, रिक्षा व तुतारी फुंकणारा माणूस हे तीन पर्याय पाठवले आहेत. या तिन्ही पर्यायांमधून एकनाथ शिंदे गटाला कोणत चिन्ह मिळते हे पहावे लागणार आहे.
आज सकाळी दहा वाजेपर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत होती. त्यामुळे शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर तीन चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आला आहे. ई-मेलवरून शिंदे गटाने तीन पर्याय सादर केल्याची माहिती आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होत. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांनी दिलेली तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने नाकारली असून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तीन नवे पर्याय देण्याचे आदेशही आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिली आहे.
निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.