ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू, त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज – प्रफुल्ल पटेल

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज, असे प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तिवात आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. नानांचे वक्तव्य म्हणजे एका प्रकारचा मीडिया इव्हेंट झाल्याची टीका त्यांनी नाव न घेता केली आहे.

स्वबळाबाबत ज्यांच्या पक्षाला जे करायचे ते त्यांनी करावे, कुणालाही बांधून ठेवलेले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील जे बोलतात त्याला जास्त वजन असते. त्यामुळे मी त्यालाच जास्त महत्त्व देतो. ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे अधून-मधून भेटत असतात. त्यामुळे त्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढायची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या संदर्भात वक्तव्य करत आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना विचारणा केली असता, त्यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता आपली प्रतिक्रिया दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!