मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाडक्या बहिणींना विधानसभेनंतर काही मिळणार नाही. ही त्यांची फसवणूकच आहे असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपाशासित राज्यात लोकशाही राहिली नाही असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
यावेळी संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा जो उमाळा आला आहे, तो केवळ दोन महिन्यांसाठी आहे”, असे राऊत म्हणालेत.
पुढे राऊत म्हणाले, ”दोन महिने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकतील. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा करतील आणि मग हे तिघेही पळून जातील. लाडक्या बहिणी योजनेचा पैसा हा तिजोरीतील आहे. तर फुटलेल्या आमदारांसाठीचा पैसा हा ठेकेदारीचा पैसा आहे”,असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊतांनी संसदेत झालेल्या गळतीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”जुनी इमारत सुस्थिती होती. ती अजून अनेक वर्षे चालली असती. त्यात कामकाज होऊ शकले असते. ग्रीक आणि इतर देशांच्या संसद इमारती जुन्या आहेत. ही इमारत बांधून एक वर्ष होत आहे. तर राम मंदिर बांधून एक वर्ष झाले आहे. पण एकाच पावसात नवीन संसद इमारतीला गळती लागली. आमच्या कार संसद आवारात आल्या त्यावेळी पाणी होते. ठेकेदारांना काम दिल्याने संसदभवन स्विमिंगपूल बनले. राम मंदिरात पाणी गळत आहे. सरकार आहे कुठे? असा प्रश्न राऊतांनी केला आहे.