पुणे : वृत्तसंस्था
राज्यात यंदा मान्सून जोरदार बरसल्याने थंडीचे आगमन लवकर होत आहे. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी राहील. तसेच मान्सून १५ ते २० सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून परतीला निघण्याची शक्यता आहे. मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते मान्सूनचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत लांबणार असून तो १५ ऑक्टोबरदरम्यान परतीला निघेल. दरम्यान, यंदा थंडीचे आगमन लवकर होईल आणि ती उशिरा निरोप घेईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दिल्ली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण मांडले आहे की, यंदा मान्सून वेळेपेक्षा किंचित आधीच परतीला निघणार आहे. नेहमी तो २० ते २५ सप्टेंबरला पूर्व राजस्थानातून निघतो. मात्र, यंदा तो १५ ते २० सप्टेंबरदरम्यान निघेल. तसेच थंडीचे आगमन लगेच होऊन धुकेही लवकर पडेल. मात्र, हवामान विभागातील शास्त्रज्ञांच्या मते मान्सून सप्टेंबर अखेरपर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊन महाराष्ट्रातून पुढे जाण्यास १५ ऑक्टोबर उजाडेल.
दिल्ली विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. ए. के. सिंग यांच्या मते, एल निनो नंतर ला-निना आपली सक्रियता दाखवण्यास ९० दिवसांचा कालावधी घेते. हा कालावधी ऑगस्टमध्येच पूर्ण झाला आहे. त्यामुळे मान्सून त्यानंतर दोन आठवड्यांत माघारी परतण्यास सुरुवात करेल. ज्या पद्धतीने गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या पावसाचा जोर कमी झाला आहे, यात उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे थंडी लवकर पडून ती जास्त लांबणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत कडाका जाणवेल.