ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिळळी गावात स्मशानभूमीचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी, अनेक कामे प्रस्तावित

अक्कलकोटी : ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी स्मशानभूमीची मोठी दुरवस्था आहे.  अशाच पद्धतीची दुरवस्था हिळळी गावांमध्ये देखील होती. याचा गांभीर्याने विचार करत सरपंच आप्पाशा शटगार यांनी स्मशानभूमीचे सुशोभिकरण करत त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान
व्यक्त केले आहे.

हिळळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने मोठी अडचण होती. एका ठिकाणी जमीन होती परंतु त्या ठिकाणी चिलार जातीचे झाडे, सुविधांची वानवा असल्याने तसेच त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नीट नसल्याने अंत्यसंस्कार होत नव्हते. ही बाब ग्रामपंचायतीला लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने या स्मशान भूमीतील झाडे झुडपे काढून सपाटीकरण करून ही जमीन नांगरून याठिकाणी अंत्यविधी करता यावे अशी परिस्थिती निर्माण केली आहे.त्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.

तसेच यासाठी रोहयो योजनेअंतर्गत झाडे लावण्यासाठी पंचायत समितीमार्फत ३ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.याचे काम सुरू करून हा परिसर सुशोभित करण्यात येत आहे, असे सरपंच शटगार यांनी सांगितले. यापुढे देखील जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत या स्मशानभूमीत विविध कामे हाती घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!