दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या खंडपीठाच्या पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी कधी होणार याबाबत अद्याप स्पष्ट झाली नाही. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. राज्यातील सत्ता संघर्षाची मागील सुनावणी एक नोव्हेंबरला झाली होती. यात ही सुनावणी चार आठवडे लांबणीवर पडली होती, त्यानंतर याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देशही दिले होते. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हंटल होतं.