मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री अस्लम शेख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, अरविंद सावंत, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
उदघाटनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नाव न घेता फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हला कोणी धमक्या देऊ नये, ‘थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये’ ‘अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही’ असा गर्भित इशारा दिला.
मुख्यमंत्री ठाकरे बोलताना सांगितले की, थप्पडसे डर नहीं लगता.. प्यारसे लगता है. आम्हाला थप्पडांची सवय आहे. टीकेचीही सवय आहे. खूप टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. टीका कोण करतंय त्याची पर्वा नाही मात्र आम्ही अशी थप्पड देऊ की परत कुणी उठणार नाही, हे लक्षात असू द्या, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. आमचं ट्रिपल सीट सरकार आहे. या सरकारसाठी कौतुकाचा तर एक शब्दही नाही, पण थप्पडांची भाषा कराल तर झापड देऊ असं मुख्य़मंत्र्यांनी सुनावलं आहे.