मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. १ मार्चपासून राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार असल्याचे सांगितले आहे. आज सोमवारपासून राज्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलने, मोर्च काढू नयेत असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांचे आवाहन, सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐकली असून मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. “करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत” असे पवार यांनी सांगितले आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाली आहे. काल राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला छगन भुजबळ यांच्यासोबत शरद पवारही होते. त्यामुळे त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे.