यूपी निवडणूक: सपाकडुन जाहीरनामा प्रसिद्ध; शेत्कर्यां०ना २ पोती डीएपी आणि २ पोती युरिया मोफत, ३०० युनिट मोफत वीज; जाणून घ्या काय-काय आहे
लखनौ: यूपी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये त्याचे प्रकाशन केले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले कि, ‘आम्ही सत्य आणि अतूट वचन घेऊन लोकांमध्ये जात आहोत. सपाने जी काही आश्वासने दिली आहेत, ती सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण झाली आहेत. मी आज उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि जनतेसमोर वचनपत्र ठेवत आहे.
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून अखिलेश म्हणाले, ‘सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा एमएसपी निश्चित केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत पैसे दिले जातील. ४ वर्षात सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार. शेतकऱ्यांना २ पोती डीएपी आणि २ पोती युरिया मोफत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची वीज मोफत दिली जाईल. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ शेतकरी स्मारक बांधण्यात येणार आहे.
अखिलेश यादव म्हणाले कि, सर्व बीपीएल कुटुंबांना दरवर्षी दोन सिलिंडर मोफत दिले जातील. मुलींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाणार आहे. कन्या विद्या धन दिले जाईल आणि इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यावर मुलींना एकरकमी ३६,००० रुपये दिले जातील. समाजवादी कॅन्टीन आणि किराणा दुकाने सुरू केली जातील. गरजूंना दहा रुपयांत समाजवादी थाळी दिली जाईल आणि किराणा दुकानापेक्षा कमी दरात रेशन दिले जाईल.
यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अखिलेश यादव म्हणाले कि, ‘एका वर्षात सर्व गावे आणि शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. राज्यात डायल ११२ अधिक बळकट करण्यात येणार आहे. सर्व पोलीस ठाणे व तहसील भ्रष्टाचारमुक्त करण्यात येणार आहेत. महिलांवरील गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले जाईल.
शिक्षणाबाबत अखिलेश यादव यांनी वचन दिले की, ‘आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल स्कूल बनवू. सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत दिले जाणार आहेत. या सोबतच सर्व गरीबांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व कुटुंबांना ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. राज्यात चोवीस तास वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरांमध्ये मोफत वाय-फाय झोन उभारले जातील आणि यूपीमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली जाईल.