अक्कलकोट, दि.26 : राज्याचे आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदार संघाकरिता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता तर बार्शीच्या 30 खाटांचे रूग्णालय 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे याची निविदा काढली जाते. अन् सिमाभागातल्या अक्कलकोट तालुक्या करिता उपजिल्हा रुग्णालया करिता केवळ मंत्र्यांनी बैठक बोलवून सकारात्मक चर्चा केली जाते. याबाबत तालुक्यातून उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे.
अक्कलकोट तीर्थ क्षेत्र हे राज्यातील टॉप फाईव्ह मधले श्री क्षेत्र असून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्य, परदेशातून दररोज वाढत चाललेली भाविकांच्या संख्या पाहता सध्या असलेली शासकीय यंत्रणा ही तोडकी ठरत असल्याने याचा फटका स्वामी भक्तांसह स्थानिकांना वेळोवेळी बसत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभा मतदार संघाच्या सर्वाागींन विकासासाठी विविध योजना आखत आहेत. त्यांना यश देखील येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावरील विविध विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याकडून देखील श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासाकरिता पुढे येऊन विविध योजना आखून त्या तालुका लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून विकासक बनावेत, अशी मागणी स्वामी भक्त व स्थानिकातून होत आहे.
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणे काळाची गरज आहे. ट्रामा केअर सेंटरची इमारत म्हणजे शोभेची इमारत झाली आहे. अद्याप केअर सुरू नाही. याबाबत देखील वरीष्ठानी त्वरीत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी पुढे येत आहे.
महाराष्ट्राच्या सीमाभागात असलेल्या अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारने विविध योजनाबरोबरच त्वरीत निधी द्यावेत, प्रलंबीत कामे मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे. तरी अक्कलकोट तालुक्याच्या ग्रामीण, शहरातील जनतेशी निगडीत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच श्रेणीवर्धन व्हावे.