सोलापूर, दि. १५-धकाधकीच्या, दगदगीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्याचा विचार करून जुनैदी नर्सिंग होमच्या माध्यमातून राबविण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर पत्रकारांच्या आयुष्याला ख-या अर्थाने उभारी देणारे ठरेल, असा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यांनी व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार दिन आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवारी, शिवछत्रपती रंगभवन येथील जुनैदी नर्सिंग होम आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.अ.हाफिज जुनैदी यांनी स्वागत तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्तविक केले.
यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पत्रकारांपेक्षाही राजकारण्यांची त-हा तर निराळीच असल्याचे सांगून त्यांच्या जीवनशैलीचा तर कुठलाच ताळमेळ नसल्याचे नमूद केले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी,आरोग्य ही संपदा आणि संपत्ती आहे, ती अशीच मिळत नसल्याचे सांगून जोपर्यंत जीवनशैलीत आपण बदल घडवून आणणार नाही, तोपर्यंत आरोग्यपूर्ण जीवन मिळणार नसल्याचे मत व्यक्त केले. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे व धर्मराज काडादी यांनीही पत्रकारांच्या आरोग्याचा विषय जिव्हाळ्याचा असल्याचे मत मांडले.
यावेळी पुरस्कारप्राप्त पत्रकारांना शाल, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याचवेळी मकरसंक्रांतीनिमित्त तीळगूळ समारंभ पार पडला. या शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी डॉ. अ. हाफिज जुनैदी, डॉ. अजीम जुनैदी, डॉ. जुवेरिया तनझीर जुनैदी, डॉ.समरीन जुनैदी केली. तर समतोल आहाराबाबत आहारतज्ज्ञ तबस्सूम शेख यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा शंभराहून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला.
यावेळी जुनैदी नर्सिंग होमचे मार्गदर्शक डॉ. अ. गफूर जुनैदी, व्यवस्थापक तौसिफ शेख, शाहनूर शेख यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता थोरे यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मानले.
आजार प्रतिबंधासाठी काळजी घ्या
आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी काळजी घ्या. त्यासाठी जीवनशैलीत आरोग्यपूर्ण जीवन मिळेल अशा पद्धतीने बदल करा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.