गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१० : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरण सुरू असून काहीकाळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून कोरोनाच्या दुसरी डोस घेण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक पहिला डोस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे सकाळी काहीकाळ गोंधळ उडाला होता.
१० मे रोजी १०० लसींचा साठा उपलब्ध झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्य केंद्रावर येण्यापूर्वीच सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र ही गर्दी वाढत चालल्याने आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांना पाचारण करावे लागले. दुधनी आऊट पोस्ट पोलिस ठाण्याचे हवालदार संजय जाधव, सुरेश लामजने यांनी दोन होमगार्ड यांच्या मदतीने पोलीस बंदोबस्त लावून गर्दी कमी करून लसीकरणाला सुरुवात केली.
येथील आरोग्य केंद्राला कोरोना लसींचा साठा अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होत असून नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दुधनी आरोग्य केंद्राला मोठया प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आता पर्यंत फक्त ७२० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तोही केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांचा आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून लसीकरण करण्यात यावी अशी मागणी युवा वर्गातून व्यक्त होत आहे. दुधनी शहराचा लोकसंख्या साधारणपणे १२ हजाराच्या आसपास आहे.
आरोग्य केंद्रातील कर्मचारी लसीकरणासाठी नियोजन करण्यापूर्वी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वयोवृद्ध नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पुढील लसीकरणवेळी योग्य प्रकारे नियोजन करून लसीकरण करण्यात यावे असे प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी यावेळी दिली.