ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे, दि. 23:-  राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी होवून लस घ्यावी, लस घेतांना नागरिकांनी मनात कोणतीही भिती बाळगू नये, कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल आहे, त्यामुळे सर्वांनी लस घेतली पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

लसीकरणाच्या प्रचार व प्रसिद्धीवर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुणे येथील राष्ट्रीय शीतसाखळी संशाधन केंद्र येथे नव्याने बांधलेल्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन तसेच शीतशाखळी उपकरणे चाचणी प्रयोगशाळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  ह्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर व्यासपिठावर आमदार दिलीप मोहिते, आमदार चेतन तुपे,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास,  आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन, संचालक डॉ. अर्चना पाटील  होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री टोपे म्हणाले, राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र हे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त पुढाकाराने कार्यान्वयीत करण्यात आले असून देशपातळीवरील हे एकमेव केंद्र आहे. या संसाधन केंद्राकडून देशभरात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शीतसाखळीचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी शासनास विविध प्रकारे तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे. शीतसाखळी सुव्यवस्थापन संदर्भातील धोरणे तथा मार्गदर्शक तत्वे ठरविण्यामध्ये ह्या संसाधन केंद्राची अत्यंत महत्त्वाची भुमिका राहणार आहे तसेच राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रतिनिधित्व या संसाधन केंद्राचे असणार आहे. केंद्र अद्यावत राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र हे आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा आहे. लसीकरणाबाबतीत पुणे हे जागतिक पातळीवर मोठे  केंद्र म्हणून ओळखले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मापदंड पाळून या केंद्राची उभारणी केली आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.टोपे यांच्या हस्ते यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागास एनएबीएल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच ऑक्सिजन व्यवस्थापन संबंधी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

प्रारंभी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.टोपे यांनी राष्ट्रीय शितसाखळी संसाधन केंद्र तसेच शीतशाखळी उपकरणे चाचणी प्रयोगशाळचे पाहणी करुन माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन यांनी तर आभार आरोग्य सेवा उपसंचालक परिवहन मिलींद मोरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!