ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि. 12 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

दि. २५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. या पार्श्वभूमिवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करावा, असे श्री. शंभरकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मतदार दिनाची यंदाची थिम “माझं मत माझं भविष्य” ही आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचनांत म्हटले आहे, सर्व जिल्हा कार्यालयांनी आणि मतदार नोंदणी कार्यालयांनी २५ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मतदार जागृती सप्ताह राबवावा. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची शिबिरे आयोजित करावीत. मतदार नोंदणीची ही शिबिरे आयोजित करण्यासंदर्भात महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घ्यावे. ही शिबिरे आयोजित करताना वातावरणनिर्मिती करण्यासाठी घोषवाक्ये, भित्तिपत्रके, रांगोळी इ. स्पर्धा आयोजित करून ते साहित्य महाविद्यालयात ठिकठिकाणी लावावे.

जिल्हा आणि मतदार नोंदणी कार्यालयांनी यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन आपल्या परिसरातील शाळेतील किंवा महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळासोबत संयुक्तपणे साजरा करावा. तसेच, आपल्या अखत्यारीत उर्वरित शाळा-महाविद्यालयांना सदर दिन निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत साजरा करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे आणि मार्गदर्शन करावे. स्पर्धांतील विजेत्यांना २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाला बक्षिसे देण्यात यावीत.

राष्ट्रीय मतदार दिनी विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा. तसेच, जिल्हा स्तरावर राष्ट्रीय मतदार दिनाला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), नायब तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना पुरस्कार द्यावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!