वसंतराव नाईक तांडा योजनेत नव्याने दहा जिल्ह्यांचा समावेश करणार – इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. १० : राज्यातील बंजारा समाजाच्या विकासासाठी बहुजन कल्याण विभागाने १०० कोटींचा निधी उपलब्ध करून घ्यावा, बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त असणा-या दहा जिल्हयांचा वसंतराव नाईक तांडा योजनेत समावेश करून तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित असलेला निधी वाढवून देण्यात यावा असे निर्देशइतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात तांडा वस्ती सुधार योजना निधी वाटपाबाबत बैठक इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.यावेळी या बैठकीला आमदार राजेश भैया राठोड,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, यासह ओबीसी व्हिजे -एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रकाश राठोड,साधनाताई राठोड यासह या समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,तांडा वस्ती सुधार योजनेसाठी दिला जाणारा निधी हा अत्यंत मर्यादीत आहे.या समाजाच्या विकासासाठी देण्यात येणा-या निधीची तरतूद विभागाने वाढवावी .यवतमाळ,नांदेड,जालना,परभणी, बीड, सोलापूर,औरंगाबाद, लातुर, हिंगोली, वाशिम या दहा ज्या जिल्हयात बंजारा समाज जास्त अशा जिल्ह्यांचा वसंतराव नाईक तांडा योजनेत समावेश करावा.या जिल्हयात बंजारा समाजाची जिल्हास्तरीय समिती करून बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात यावेत.जेणेकरून या समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तांडा वस्तींचा विकास करताना पाणी,रस्ते व समाजमंदिर या कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देशही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिले