मुंबई, दि.४ : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या.आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला.
७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं.
शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जिवनात अनेक चढाव-उतार आले.असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ही देखणी अभिनेत्री नृत्य, गायन व अभिनय करू लागली. वडिलांचे दिवाळं निघाल्यामुळं हे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईस आलं. त्यावेळेस शशी ७ ते ८ वर्षांची होत्या. तिथं त्यांची नूरजहाँसोबत गाठ पडली व तिला नूरजहाँ यांनी पारखले. त्यानंतर त्यांना‘झीनत’ या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळालं. त्याच्या ‘जुगनू’ व अजून ३-४ चित्रपटात ४०० रुपये महिन्याने कामे केलीत. नंतर त्यांच्याकडे तत्कालीन निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती व व्ही. शांताराम यांचे लक्ष गेलं. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिलं. वयाच्या विसाव्या वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल बरोबर त्यांचा विवाह झाला. तिला २ मुली झाल्या.
शशिकलाची संवाद फेकण्याची लकब व साजेसा अभिनय (भृकुटी व नेत्रांनी) या गुणांमुळे तिच्या निगेटिव्ह भूमिकाही उच्च अभिनित असत. एकापेक्षा एक नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांकडे तिने १०० पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. यात ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकलाने २००५पर्यंत चित्रपटांत कामे केलीत.
२००७ साली भारत सरकारनं शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं, तसंच २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.