विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी द्या गुरुवारी होणार मतदान! प्र-कुलगुरूंकडून पाहणी; 16 केंद्रांवर यंत्रणा सज्ज
सोलापूर, दि.26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद, आणि अभ्यासच्यामंडळांच्या विविध 38 जागांसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत शहर व जिल्ह्यातील एकूण 16 केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदान केंद्रावर यंत्रणा सज्ज असून बुधवारी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी ग्रामीण भागातील अनेक केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार मंडळांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. काही जागा बिनविरोध झाल्या असून काही जागांसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होणार आहे. सिनेटच्या पदवीधरमधून विविध प्रवर्गातील नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी 8 हजार 674 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाविद्यालय शिक्षकांच्या नऊ जागांसाठी, विद्यापीठ शिक्षकांच्या दोन जागांसाठी, संस्था प्रतिनिधीच्या चार जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यापरिषदेच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या खुल्या प्रवर्गाच्या एका जागेसाठी, अभ्यासमंडळाच्या रसायनशास्त्राच्या तीन जागेसाठी, प्राणिशास्त्राच्या तीन जागांसाठी, इंग्रजीच्या तीन जागेसाठी, शैक्षणिक मूल्यमापनच्या तीन जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी घारे यांनी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी बुधवारी वैराग येथील सुवर्णलता गांधी महाविद्यालय, बार्शी येथील शिवाजी महाविद्यालय, कुर्डुवाडी येथील के. एन. भिसे महाविद्यालय, माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.