जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणे ही सरकारची प्राथमिकता – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणं हे या सरकारची प्राथमिकता आहे. जत तालुक्यासाठी स्वतंत्र योजनेचे काम सुरु केले आहे. कवठेमहाकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी या भागात ज्या गावांना आतापर्यंत पाणी पोहचू शकत नाही तिथे ही अतिरिक्त पाईपाईलाईन करणे, आमदार सुमनताई पाटील यांनी सूचविलेल्या काही गावांमध्ये वाढीव पाईपलाईन करुन पाणी देणे अशी कामे सुरु आहेत. म्हैसाळ, टेंभू व यापुर्वी झालेल्या आणखीन काही योजनांच्या माध्यमातून तासगाव व कवठेमहाकाळ तालुक्यात पाणी आणून हा भाग जो दुष्काळी भाग म्हणून गणला जात होता तो आता अतिशय समृध्द भाग होईल याची मला खात्री आहे. असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कवठेमहाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढालगाव वितरिकेच्या कामाची पाहणी व जलपुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्वश्री आशाराणी पाटील, भगवान वाघमारे, संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके, पंचायत समितीचे सदस्य विकास हक्के, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अनिता सगरे, जिल्हा नियोजन समितचे सदस्य रविंद्र पाटील, अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गेले अनेक वर्षे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. आता हा संघर्ष संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळी भागालाही पाणी देण्यासाठी प्रयत्न करु. पाण्यासाठी आता यापुढे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही. यासाठी पाणी योजना तातडीने पुर्ण करुन दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत या भागात आता म्हैसाळ, टेंभू या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून कृष्णेचे व वारणेचे पाणी पोहचत आहे. उपसा सिंचन योजना पुर्णत्वास नेणे व त्या सक्षमपणे चालविणे यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता आहे. यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. तरीही ज्या ज्या शेतक-यांच्या शेतात उपसा सिंचन योजनांचे पाणी आले आहे. त्या त्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी प्रामाणिकपणे भरुन पाणी योजना सक्षमीकरणासाठी आपला हातभार लावावा. उपसा सिंचन योजनेतून चोरुन पाणी वापरु नये, किंवा पाणी वापरुन पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करु नये. वापरलेल्या पाण्याची शंभर टक्के पाणीपट्टी वसुली झाल्यास उपसा सिंचन योजना सक्षमपणे चालतील व टिकतीलही.
दुष्काळी पट्ट्यात आलेल्या पाण्यामुळे हरित क्रांतीचे स्वप्न साकार जरी होत असले, तरीही पाण्याचा योग्य पध्दतीने वापर शेतीसाठी होणे आवश्यक आहे. पारंपारिक शेती न करता अधुनिक पध्दतीने शेती करुन पुढील काळात या भागाचा कायापालट होईल. त्याचबरोबर आर्थिकस्तरही सुधारेल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुष्काळी भागातील जनतेने पाण्यासाठी अनेक मोर्चे काढले, अंदोलने केली. पण या पुढील काळात ती आवस्था निर्माण होणार नाही. दुष्काळी भागातील जनता चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत होती. आता ही स्वप्ने पुर्णत्वास येत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली असून टप्प्याटप्याने निधी प्राप्त होईल. त्यानूसार प्राधान्यक्रम ठरवून कामांसाठी निधी दिला जाईल.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जतच्या पुर्व भागातील 65 गावांना पाणी देणे कोठुनही शक्य नव्हते अशावेळी अभ्यास करुन यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वारणेचे शिल्लक 6 टीएमसी पाणी देण्याचे निश्चित केले आहे. आता हमखास पाण्याची उपलब्धता झाल्याने जतच्या 65 गावांसाठी सुधारित नवी पाण्याची योजना तयार करण्याचे काम सुरु असून ही योजना तातडीने राज्य शासनाकडून मंजूर करुन घेतली जाईल.
आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी लाखो भक्त येतात. या बिरोबा देवस्थानाच्या विकासासाठी 4 कोटी 60 लाख रुपयांचा प्रस्तावित निधी तातडीने मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर मुंबई येथे बैठक आयोजित करुन हा निधी मिळवू असे आश्वासन पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
खासदार संजय पाटील म्हणाले, दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत 6 टीएमसी पाण्याची तरतुद केली. ही बाब वाखण्यासारखी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ही दुष्काळी भागात बळीराजा समृध्दी योजना राबविण्यात येईल. तसेच निधीची तरतुदही करण्यात येईल. प्रस्तावित नवीन सुधारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी ज्या प्रमाणे 6 टीएमसी पाणी दिले त्याचप्रमाणे टेंभू सिंचन योजनेसाठी ही मंजूर करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरु असलेल्या दुष्काळी भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न आता निकाली निघत आहे. त्यामुळे दुष्काळी भागात आता आर्थिकस्तर उंचावेल. त्याच बरोबर तरुणांच्या हाताला काम मिळेल. योजनांमुळे येणाऱ्या पाण्याचे शेतकऱ्यांनीही योग्य नियोजन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेतील मुख्य कालावा 1 ते 35 किलोमिटर असून याचे सिंचन क्षेत्र 10 हजार हेक्टर आहे. त्याच बरोबर गोरेवाडी डावा कालव्यावरील घाटनांद्रे व तिसंगी वितरिकेची लांबी सुमारे 10 किलोमिटर आहे. तर याचे सिंचन क्षेत्र 872 हेक्टर आहे. त्याचबरोबर कवठेमहाकांळ तालुकयातील लाभ क्षेत्राखाली 27 गावांचा समावेश असून यामधील 22 गावे आरेवाडी, ढालगाव, आढळगाव, लंगरपेठ, ढोलेवाडी, इरळी, आलकोडी एस, रांजणी, नांगोळे, कोकळे, बसाप्पावाडी, करलहट्टी, मोघमवाडी, चुडेखिंडी, चोरोची, जांभुळवाडी, कदमवाडी, दुधेभावी, ढालेवाडी, नागज, निमज, घोरपडी आदी गावांचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक अमोल किसन हंकारे यांचा एनसीईआरटी मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीयस्तरावर तंत्रज्ञानातील बेस्ट डिजिटल गेम पुरस्कार पटकविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अनिता सगरे, चंद्रकांत हक्के, संजय हजारे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक टी. व्ही पाटील यांनी केले. सुत्रसंचालन संजय शुंगारे यांनी केले.