गुरुषांत माशाळ,
दुधनी दि. २७: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद सोलापूरसह, इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत
झपाट्याने वाढ होत आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशानुसार विकेंड लॉकडाउनला आजपासून सुरुवात झाली आहे.दुधनीत विकेंड लॉकडाउनचा आज पहिला दिवस होता. विकेंड लॉकडाउनमध्ये लोकांनी आणि व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीने घरात राहून कोरोना विरुद्धच्या लढाईच्या दुसऱ्या टप्प्यात आपले योगदान देणे अपेक्षित आहे.

दुधनी शहरात अगदी सकाळी – सकाळी उघडणारी दुकाने देखील बंद असुन सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे. शहरात सकाळच्या सत्रात विकेंड लॉकडाउनला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा विकेंड लॉकडाउन अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानांसाठी आहे. शहरात अत्यावश्यक सेवेतील किराणा, दूध, दवाखाने, मेडिकल आणि फळ-फळावांच्या दुकान व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने कडकडीत बंद होते. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या जास्त होती. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला मदत करावे,असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.