कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये सध्या गुन्हेगारी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे एका राज्यमंत्र्यावरच बॉम्बहल्ला झाला आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले.
हल्ल्यात झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. टीएमसीच्या मुर्शीदाबादमधील जिल्हाध्यक्ष अबु ताहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोलकात्याला हलविण्यात आले.
हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. हुसेन आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2016 विधानसभा निवडणुकीत जांगीपूरमधून निवडून आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून डॉक्टर हुसेन यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती खान यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी हल्ल्यामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे.