पोटासाठी आयुष्यभर बायकापोरांना सोबत घेऊन भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवाना सरकार लसीकरण कधी करणार ? सुनिल बंडगर यांचा सवाल
अक्कलकोट : देशात सध्या कोरोनाने प्रचंड हाहाकार उडाला असल्याने कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकजणांना भिती सतावत आहे. सध्या शासनाकडून लसीकरण चालू आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस अत्यंत अल्प प्रमाणात येत असल्याने सर्वांना लसीकरण करणे शक्य होत नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढली आणि मृत्यु दर वाढले.
शासनाने 45 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीला लसीकरण करण्यात येईल असे आदेश दिले आहेत परंतु अनादीकाळापासून शेळी मेंढी तसेच आपल्या कुटुंबातील पोराबाळांना घेऊन रानोमाळ भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवाना शासनाकडून त्यांना लसीकरण करण्याबाबत कोणतीच उपाययोजना राबवली नसून त्वरित त्यांना लसीकरणाची डोस देण्यात यावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
एकीकडे लसीचा पुरवठा व्यवस्थित होत नसून लसीच्या डोस ठिकाणी गर्दी होत आहे. शासनाकडून योग्य प्रमाणात लसीचे वाटप होत नाही त्यामुळे कित्येक लोकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यात वशीलेबाजी करुन अनेकजण लसीकरणाचे दोन्ही डोस करुन घेतले आहेत तर सर्व सामान्य जनता काय करणार बिचारे शासनाकडे वाट पाहण्यापलीकडे दुसरे काही नाही. धनगर समाज बांधवाना लसीकरणाचे डोस कुठे आणि कधी मिळणार याची काहीच माहिती त्यांना मिळत नाही त्यामुळे अनेक मेंढपाळ बांधव लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. ते आपले गाव सोडून आई वडील नातेवाईक यांच्या पासून कोसोमैल दूर आहेत. त्यांच्याकडे शासनाने जातीने लक्ष घालून सर्व मेंढपाळ बांधवाना लसीकरणाचे डोस देऊन सहकार्य करावे असे आवाहन सुनिल बंडगर यांनी केले आहे.