ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला; काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला अशी मागणी करणारं पत्र आता काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. हा सिनेमा 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिलिज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलिज केला जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

फॅसिस्ट विचारांचे नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची हत्या केली. याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचारांचे चित्रपट निर्माते 30 जानेवारी 2022 Why I Killed Gandhi? हा चित्रपट दिग्दर्शित करू पाहात आहेत. महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळखही गांधीजींच्या नावाने होते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येतं.

महात्मा गांधी यांच्या लढ्याने हे दाखवून दिलं आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. एकीकडे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जातो आहे.

अशात Why I Killed हा चित्रपट द्वेष, हिंसक वृत्तीचं प्रदर्शन करणारा आहे. कोणत्याही घृणास्पद आणि अमानवीय कृत्याचं उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलिज होऊ देऊ नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करत आहोत.

या सिनेमात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे हे पात्र साकारलं आहे. हा सिनेमा 2017 मध्ये चित्रीत झाला होता. तो रिलिज होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र चा दिवसांपूर्वी याचा ट्रेलर आला आणि हा सिनेमा रिलिज होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून वाद निर्माण झाला. ज्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!