मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारावरून राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचारामागे रझा अकादमी असल्याचा आरोप झाल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहेत. ‘फडणवीस यांच्या कार्यकाळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. ‘भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे हिंदूंवर किंवा एकाच बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, ते कुणीही असू देत. त्यांना सोडलं जाणार नाही. कायदा सगळ्यांना सारखा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकेकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हाही राज्यात असे काही प्रकार घडले होते. तेव्हा त्यांनी रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? महाराष्ट्राला कायद्याच्या राज्याची परंपरा आहे. इथं चेहरा पाहून कारवाई होत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच, अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले.