कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चातर्फे वाहिली श्रद्धांजली
सोलापूर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही त्या निष्पाप कन्येला न्याय मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यात आली होती, मात्र जर फास्टट्रॅक कोर्टाच्या केसच्या निकालाला पाच वर्षे लागत असतील तर मग जनरल केसचे निकाल काय असतील?
आज पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून 58 मोर्चे काढण्यात आले मात्र यापुढे कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढावा लागेल असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला आहे. कोपर्डीच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ सदर कन्येला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याप्रसंगी अनंत जाधव बोलत होते. कोपर्डी घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या घराघरात उमटले होते. एक वर्षभर हे प्रकरण ठीक-ठिकाणी चर्चिले जात होते. मात्र सर्वांनाच सध्या या घटनेचा विसर पडला आहे की काय? असा सवालही माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.
कोपर्डीच्या कन्येमुळे संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला. आज 5 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा त्या निष्पाप ताईला न्याय मिळाला नाही. ते नराधम आजही जिवंत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या नराधमांना फाशीवर लटकवलं जात नाही, तो पर्यंत आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने लढा चालूच ठेवणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त घेतली आहे.
कोपर्डीतील घटनेला पाच वर्षे लोटूनही जर त्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर न्यायालयावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे कायद्यावरील विश्वास आणि महाराजांच्या महाराष्ट्रात अशी कृती करणाऱ्या नराधमांना तात्काळ फासावर लटकवावे अन्याथा यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करावे लागेल, अशी संतप्त भावना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत म्हणाले, जोपर्यंत कोपर्डीच्या ताईला न्याय मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. त्याचबरोबर राज्यात कोणत्याही समाजाच्या आई-बहिणींसोबत असे कृत्य करणाऱ्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड कायम रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे सांगितले.
श्रध्दांजली वाहण्यासाठी राज सरडे, बजरंग जगदाळे, रमेश हावळे, योगेश बंडगर, सौदागर चव्हाण, उमाकांत कारंडे, श्रीकांत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.