ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वंचितांची सेवा करणारा अक्कलकोटचा ‘सेवाभावी सखी ग्रुप’ कोरोना काळातही केले उल्लेखनीय कार्य

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.८ : आजच्या विज्ञानवादी आणि पुरुषप्रधान संस्कृतीत महिला ह्या अनेक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने
काम करत आहेत.सामाजिक आणि सेवाभावी कार्यात देखील त्या पुढे येऊन कार्य करताना दिसत आहेत.सखी ग्रुप अक्कलकोट या महिलांच्या ग्रुपने अगदी अशाच प्रकारे कार्य करून आपल्या सेवाभावी व समाजोपयोगी कार्याने अक्कलकोट परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वंचिता सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या ब्रीद वाक्याची प्रेरणा घेऊन वटपौर्णिमेच्या दिवशी २०११ साली हा ग्रुप स्थापन केला.या ग्रुपमध्ये सोनल जाजूसह,मल्लमा पसारे सुवर्णा साखरे,अनिता पाटील रत्नमाला मचाले,डॉ. दीपमाला आडवितोट,उषा छत्रे, अश्विनी बोराळकर, आशा भगरे, श्रद्धा मंगरूळे, लक्ष्मी आचलेर, वेदिका हर्डीकर, प्रियंका किरनळळी, रोहिणी फुलारी, शीतल जिरोळे,माधवी धर्मसाले, मिलन तोरसकर, वर्षा शिंदे कार्यरत आहेत.

आज पर्यंत या महिलांनी अनेक लोकोपयोगी प्रकल्पाद्वारे वंचित, गरीब व गरजूची सेवा व मदत केलेली आहे. ज्या समाजात आपण राहतो त्याचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतूनच त्यांच्याकडून निरनिराळे प्रकल्प राबवले जात आहेत. दरवर्षी वंचिता सोबत दिवाळी हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे चालू आहे. यामध्ये या महिला दर दिवाळीला अगोदरपासूनच नियोजन करत असतात दिवाळीच्या दिवशी अक्कलकोटमधील गरीब गरजू वंचित लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन श्रमसेवा व स्वच्छता करून तेथील महिला व बालकांना एकत्र करून एकत्र बसून पारंपारिक पद्धतीने औक्षण करतात. त्यांना व्यवस्थित बसून स्वच्छता, आरोग्य इत्यादी बाबतचे ग्रुपमधील महिला डॉक्टर्स व इतर सदस्य समुपदेशन करतात.

या गरीब वंचित लोकांना फराळाचे जिन्नस करणे परवडत नाही,अशा या गरीब बालकांना व महिलांना सर्व प्रकारच्या दिवाळी फराळाचे देऊन आनंद देतात. यानंतर या महिला या बालकांना व महिलांना दिवाळी भेट म्हणून दरवर्षी काहीतरी नवनवीन वस्तू भेट देत असतात. आतापर्यंत सोलापूरी चादरी, चटया,साड्या,कपडे, टॉवेल्स,डस्ट बीन्स इत्यादी वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. सखी ग्रुपतर्फे आजपर्यंत एक हजार देशी वृक्षांची लागवड व संगोपन करण्यात आलेले आहे अक्कलकोट परिसरामध्ये दरवर्षी आठ ते दहा फुटी शंभर देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले जाते, सखी ग्रुप तर्फे लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षा मध्ये रूपांतर झालेले आहे. सखी ग्रुप तर्फे अक्कलकोट व परिसरातील गरीब व गरजू रुग्णाला वैद्यकीय मदत दिली जाते. त्यांनी दिलेल्या मदतीमुळे बऱ्याच गरजू रुग्णांना आज पर्यंत मदत झालेली आहे.ग्रुपतर्फे निरनिराळ्या परिसरातील रहिवाशी व इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. अक्कलकोट परिसरात येणाऱ्या झोपडी करून राहणाऱ्या लोकांना धान्य,खाद्यपदार्थ,कपडे,साड्या,स्वच्छ पाणी आदिचे वितरण ग्रुप तर्फे या महिला नेहमीच करत असतात. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना या महिलांनी आपली मदत येथून पाठविलेली होती.

यावर्षी अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर आलेला होता. बबलाद हे गाव शासकीय व सामाजिक संस्थांच्या मदतीपासून दूर होते तेव्हा या सखी ग्रुपने या गावातील शंभर कुटुंबांना संसारोपयोगी धान्य, शिधा, खाण्याच्या वस्तू, बिस्किटे, स्वच्छ पाणी व कपड्यांचे वितरण केले होते. तसेच या महिला जानेवारी महिन्यापासूनच आपापल्या घरात व परिसरात पक्षी-प्राणी यांच्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करत असतात. कोरोना ही महामारी सुरू झाली तेव्हा मार्च महिन्यातच सखी ग्रुपने अक्कलकोट बस डेपोतील तीनशे चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले होते तसेच या महामारीशी लढण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत या सर्व कर्मचाऱ्यांचे ग्रुप मधील महिला डॉक्टरानी समुपदेशन देखील केले होते.

या सखी ग्रुप मध्ये अनेक शिक्षिका, डॉक्टर्स,ग्रहीणी, व्यवसायिक, वकील पत्नी आधी उच्चभ्रू महिला आहेत.त्याशिवाय दर महिन्यात या महिलांचा स्नेहमेळावा भरत असतो यामध्ये सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करण्यात येते तसेच दोन तीन महिन्यातून एकदा निसर्गरम्य, शैक्षणिकस्थळे व ऐतिहासिक स्थळांना भेट व सहली असा कार्यक्रम त्या करत असतात.असा हा अक्कलकोट येथील समाजोपयोगी प्रकल्पातून वंचित व गरीब लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेला महिलांचा सेवाभावी कार्याचा वसा घेतलेला सखी ग्रुप आहे. या सेवाभावी कार्यामुळे आत्मिक समाधान व आनंद मिळतो असे या ग्रुप मधील प्रत्येक महिला सदस्यांचे मत आहे.

या सखी मधील महिलांचे एकमेकाविषयी अत्यंत मैत्रीपूर्ण प्रेमाचे संबंध निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाच्या आनंदी व दुःखाच्या प्रसंगात या महिला सहभागी होत असतात विशेष करून एखादी दुःखद घटना घडली तर या सर्वजणी धावून येतात असा हा आगळावेगळा सखी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!