वीजेच्या धक्क्याने गमावले हात, पतीनेही सोडली साथ, जगण्याची जिद्द न हरलेल्या झुंजार महिलेला तुम्हीही द्याल शाबासकी
पिंपरी चिंचवड : गरोदर असताना कामाच्या ठिकाणी करंट लागून सुनीता पवार याना आपले दोन्ही हात गमवावे लागले. हात गमावल्यानंतर त्यांच्या संमतीने पतीने दुसरे लग्न केले . मात्र रोजची होणारी भांडे आणि त्रास यामुळे पती त्यांना सोडून गेला आणि सुनीता पवार याना आता आपले जीवन संपवावेसे वाटले पण, तेव्हा त्यांच्या मुलांच्या काळजीने आपला विचार बदलला आणि मुलांसाठी जगण्याचा निवर्णय त्यांनी केला. आज माझ्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत त्यांनी देखील आत्महत्या करण्याचा विचार न करता आयुष्य आनंदाने जगले पाहिजे, असा सल्ला सुनीताने दिव्यांग, अपघातग्रस्त व्यक्तींना दिला आहे.
सुनीता पवार याचं आयुष्य सर्वसामान्यांसारख होतं. तिचा विवाह देखील झालेला होता. आनंदी आयुष्य जगत असताना नियतीने तिचे दोन्ही हात हिरावून घेतले. 12 वर्षांपूर्वी पतीसह ती एका बंगल्याच बांधकाम करत होती. तेव्हा, एका महिलेला करंट लागला त्या महिलेला वाचवत असताना सुनीताला आपले दोन्ही हात गमवावे लागले. सुनीता तेव्हा सहा ते सात महिन्याची गरोदर होती असे तिने सांगितले . करंट लागल्यावर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले पण तिचे दोन्ही हात वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. …त्यानंतर सुनीताच आयुष्यच बदलून गेले , पतीने सुनीताच्या संमतीने दुसरा विवाह केला. सवतीसह सुनीताने काही महिने संसार केला. पण सतत होणारी भांडणे, चिडचिड यामुळे सुनीताचा पती तिला सोडून गेला. मात्र सुनीता खचली नाही. पुन्हा, तिने नव्या जिद्दीने आणि जोमाने आयुष्य जगण्यास सुरुवात केली. पतीवर वाईट वेळ आली असती तर मी सोडून गेले नसते ,पण त्यांनी माझी साथ अर्ध्यात सोडली याची खंत मला वाटते आहे.
सुनीता स्वतः स्वयंपाक करते, घरगुती काम करते हे पाहून अनेकांना तीच कुतूहल वाटतं.आयुष्यात अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आता आपलं आयुष्य संपलं आहे. असा विचार करून सुनीताने आत्महत्या करण्याचा विचार देखील केला पण आपल्या मुलाबाळांच काय होईल या विचाराने जिद्दीने आयुष्य जगत आहे. सुनीताला बारा वर्षांची मुलगी, एक मुलगा आहे. आयुष्य हे एकदाच येतं ते आनंदाने जगायला हवं. दिव्यांग किंवा अपघातग्रस्त व्यक्तींनी आयुष्य संपवण्याचा, आत्महत्या करण्याचा विचार करू नये आयुष्य हे सुंदर आहे असे आवाहन तिने केले आहे.