ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात यंदा भविकांविना दत्त जयंती; कोरोनामुळे साध्या पध्दतीने कार्यक्रम

 

अक्कलकोट,दि.२९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. सकाळी १० : ३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली  दत्त जन्म आख्यान झाले. यानंतर दत्त नामजप व सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या हस्ते पाळणा पूजन व दत्त जन्मोत्सव इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन मोजके सेवेकरी व विश्वस्त पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा श्रींच्या गाभारा मंडपात संपन्न झाला. याप्रसंगी कोणत्याही भाविकांचा यात सहभाग नव्हता. प्रतिवर्षी दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या भाविकांना यंदा कोरोनामुळे सामुहिक संपर्क टाळण्याकरीता येण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच उद्या सायंकाळी अक्कलकोट शहरातुन निघणारा पालखी सोहळा व वर्षाखेर व नुतन वर्षाचे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी,  विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते. दत्त जयंतीनिमित्त मंदीर बंद असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. संतोष गायकवाड,पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी चोख बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन
केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!