ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमधील बिनविरोध ग्रामपंचायतींना आमदार कल्याणशेट्टी देणार १५ लाखांचा निधी

 

 

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण गावात वाद विवाद देखील निर्माण होतात.त्यामुळे बऱ्याचदा गावाच्या विकासावरती परिणाम होतो,ही बाब लक्षात घेऊन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बिनविरोध गावाला पंधरा लाख रुपयाचा विकास निधी जाहीर केला आहे.

निवडणुकीचे खरी प्रक्रिया अद्याप सुरू होण्यात बाकी आहे.सध्या निवडणुकीविषयी वातावरण सध्या तापलेला असताना आमदार कल्याणशेट्टी यांनी अशा प्रकारच्या निधीची घोषणा केल्याने गावा-गावात या निर्णयाची चर्चा सुरू आहे.यामुळे गावे बिनविरोध होण्यास निश्चितच मदत होणार आहे.२०२० मध्ये राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा पाया असतो. जर या निवडणुका सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्या तर ती लोकशाहीसाठी चांगली बाब असतेच, शिवाय त्यातून गावाचा एकोपा दिसतो आणि जिथे एकोपा असतो तिथे विकास होण्यास हातभार लागतो.
सध्या सुरू असणारे कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. निवडणुकांमुळे कोरोना फैलावू शकतो याची शक्यता लक्षात घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. कृपया आपण सर्वजण एकत्रित येऊन यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पाडून एक नवा पायंडा सुरू करूया.
यामुळे कोरोनापासून वाचण्यास मदत होईलच, शिवाय प्रशासनावर येणारा ताण कमी होईल आणि निवडणूक खर्चाची बचत सुद्धा होईल.अक्कलकोट मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील त्या गावांना मी १५ लाख रूपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार आहे.या निधीमधून गावाच्या विकासासाठी भरीव योगदान मिळेल आणि अनेक विकासकामे मार्गी लागतील,असेही ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!