अक्कलकोट, दि.१६: संचारबंदीच्या काळात मोडकळीला आलेल्या पथ विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांना विनातारण १० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्यात येत आहेत.अक्कलकोट मध्ये हि या योजनेला सुरुवात झाली असून सोमवारी शहरातील १५ लाभार्थींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.
अक्कलकोट नगर परिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेअंतर्गत रस्त्यावरील व फुटपाथवरील व्यवसाय करणारे फेरीवाले जसे की,फळे,भाजीपाला, चहा, भजी पाव, अंडी, कापडी,चप्पल कारागीर, स्टेशनरी साहित्य विक्री करणारे,केश कर्तन दुकाने, पान टपरी वाले, कपडे धुण्याची दुकाने इत्यादी दुकानांना बँकेकडून हे कर्ज तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेमार्फत ३० फेरीवाल्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून त्यातील १५ लाभार्थ्यांना बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी शरणाप्पा पुजारी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक बसलींगप्पा खेडगी, ऋतुराज राठोड, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत धेंडे, श्रीकांत अभिवंत, विनायक लकुरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले.तरी फेरीवाल्यांनी महा- इ सेवा केंद्र, सीएससी सेंटर, मोबाईल मार्फत ऑनलाईन अर्ज सादर करावेत,असे आवाहन धेंडे यांनी केले आहे. लाभार्थ्याने मुदतीत कर्ज फेडल्यास केल्यास वाढीव कर्ज देखील मंजूर करून देण्यात येईल,असे बँकेचे शाखाधिकारी शरणाप्पा पुजारी यांनी यावेळी सांगितले. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांनी केले आहे.