---Advertisement---

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघात; ट्रक दुचाकीवर उलटला, दोन जणांचा जागीच मृत्यू

By team
On: March 14, 2026 3:07 PM
Follow Us:
---Advertisement---

भंडारा : वृत्तसंस्था

नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा हृदयद्रावक प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून मित्रासह घरी परतणाऱ्या पित्याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरात गिट्टीने भरलेला १२ चाकी ट्रक दुचाकीवर पलटी झाल्याने झालेल्या या अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश सावस्कार (वय ४८) यांच्या मुलीचे लग्न २ एप्रिल रोजी नियोजित आहे. लग्नाच्या तयारीची धांदल सुरू असताना रमेश सावस्कार हे आपले मित्र अशोक काळबांदे (वय ५२) यांच्यासोबत सासुरवाडी खामखुरा येथे लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. १३ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पत्रिका वाटप आणि जेवण आटोपून दोघेही दुचाकीने आपल्या गावाकडे परतत होते.

दरम्यान, अर्जुनी मोरगावजवळील अरूण नगर परिसरातून जात असताना समोरून गिट्टीने भरलेला एक १२ चाकी ट्रक भरधाव वेगात येत होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड ट्रक थेट सावस्कार यांच्या दुचाकीवर पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली दबल्या गेल्याने रमेश सावस्कार आणि अशोक काळबांदे या दोघांचाही जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला.

अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. मात्र अशोक काळबांदे यांच्या खिशात सापडलेल्या पाकिटाच्या आधारे त्यांची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील पंचनामा आणि तपास सुरू केला आहे.

मृतक रमेश सावस्कार हे इंदोरा येथील ‘कमलाबाई कृषी केंद्रा’चे मालक होते, तर अशोक काळबांदे हे ‘अशोक फोटो स्टुडिओ’चे मालक होते. दोघेही आपल्या व्यवसायामुळे परिसरात परिचित होते. ज्या घरात काही दिवसांनी सनई-चौघडे वाजणार होते, त्या घरावर अचानक दुःखाचे सावट पसरले आहे. सावस्कार आणि काळबांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण लाखांदूर तालुक्यात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!