---Advertisement---

पुणे रिंगरोडला अजितदादांचं नाव द्या! रोहित पवारांचा अमित शाहांना थेट इशारा

Follow Us:
---Advertisement---

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाची मागणी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. केवळ पुतळ्याचे अनावरण करून अजितदादांचे कार्य मर्यादित ठेवू नका, तर पुणे रिंगरोडला त्यांचे नाव द्या आणि विमान अपघाताची सीबीआय चौकशी जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे जिल्हा परिषदेत अजितदादांना मानणाऱ्या नेत्यांनी त्यांचा पुतळा उभारल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र, अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या सत्तेत मंत्रीपदे उपभोगणाऱ्या नेत्यांना पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देण्याची इच्छा नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी दशकाहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. अशा परिस्थितीत त्यांच्या नावाने एखादा मोठा प्रकल्प ओळखला जाऊ नये, अशी काहींची भूमिका आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

केवळ पुतळा अनावरणापुरते अजितदादांचे कर्तृत्व मर्यादित न ठेवता पुणे रिंगरोडला अजितदादांचे नाव देण्याची घोषणा अमित शाह यांनी करावी. त्याचबरोबर अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा अजितदादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, अजित पवार यांचा विमान अपघात होता की घातपात, यामागील सत्य समोर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असेही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले. यापूर्वीही त्यांनी विमान अपघातातील विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवार यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान ही मागणी पुढे आल्याने राजकीय घडामोडींनाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आता अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात या मागण्यांबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!