ओमान : चित्तथरारक, रोमहर्षक आणि रोमांचक हे शब्दही भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्याचा थरार वर्णन करण्यासाठी अपुरे पडतील! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवत नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना मोहित उलवाने चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने साखळी फेरीतील पराभवाचा वचपाही घेतला.
ओमानमधील अल अमिरात येथील मिनिस्ट्री टर्फ-2 मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 337 धावा उभारल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 338 धावांचे मोठे आव्हान होते. पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खानने 107 धावांची शतकी खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार मारले.
338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली. पाचव्या षटकात हाताला चेंडू लागून दुखापत झाल्यानंतरही आर्यवीरने जिद्द दाखवत 61 चेंडूंत 58 धावा केल्या. त्याच्या खेळीत नऊ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर लक्ष्यने एका बाजूने डाव सावरत 101 चेंडूंत 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
अन्वय द्रविड 19 धावांवर धावबाद झाला, तर मनाल चौहानने अवघ्या 32 चेंडूंत 47 धावा फटकावत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, ठरावीक अंतराने विकेट पडत असल्याने सामन्यातील रंगत वाढत गेली. भारताची नववी विकेट 309 धावांवर पडली, तेव्हा विजयासाठी आणखी 29 धावांची गरज होती. अशा कठीण परिस्थितीत दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहित उलवाने हार न मानता आक्रमक खेळ केला.
मोहितने 26 चेंडूंत नाबाद 49 धावा ठोकल्या. त्याने पाच चौकार आणि तीन षटकार लगावत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. चिगुरपती वेंकटानेही 8 चेंडूंत दोन चौकारांसह 11 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली.
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी आठ धावांची गरज होती. सामना अखेरच्या चेंडूवर तीन धावांवर येऊन ठेपला. पाकिस्तानचा फिरकीपटू अहमद हुसैन गोलंदाजीसाठी सज्ज होता. स्ट्राइकवर असलेल्या मोहित उलवाने दबावाखाली न येता शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. भारतीय खेळाडूंनी मैदानात जल्लोष करत या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला.










