आशिया कप २०२६ मधील अंडर-१९ स्पर्धेत वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग याने शानदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात आर्यवीरने १३१ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले.
आर्यवीरने सुरुवातीला कर्णधार लक्ष्यसोबत पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर व्ही. के. विनीतसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव भक्कम केला. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली.
याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यातही आर्यवीरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा केल्या होत्या. या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याने कर्णधार लक्ष्यसोबत १२९ धावांची अभेद्य भागीदारी केली. लक्ष्यनेही नाबाद ५३ धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने नेपाळवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता.
मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आर्यवीरला मोठी खेळी करता आली नव्हती. पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करताना त्याने ४० चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. यात एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. चुकीचा फटका खेळल्याने त्याला आपली विकेट गमवावी लागली होती.
पाकिस्तानविरुद्धची निराशा मागे टाकत आर्यवीरने UAE विरुद्ध शतक झळकावून दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे अंडर-१९ आशिया कपमध्ये वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.











