कोल्हापूर, वृत्तसंस्था : गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त संचालकांच्या निवडीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी समविचारी आघाडीच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलकांसोबत दूध देणाऱ्या म्हशीही सहभागी झाल्या. एका म्हशीच्या गळ्यात ‘मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या की!’ असा फलक लावण्यात आला होता, तर दुसऱ्या म्हशीच्या अंगावर ‘गोकुळ वाचवा’ असा संदेश लिहिण्यात आला होता.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण करण्यात समविचारी आघाडीला अपयश आल्यानंतर शासनाने चार संचालकांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विरोध केला आहे. त्यातूनच दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला.
मोर्चात सहभागी झालेल्या एका म्हैस मालकाने शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांपैकी किती जणांकडे गायी-म्हशी आहेत, असा सवाल उपस्थित केला. आमची म्हैसही म्हणते की, मला गोकुळवर संचालक म्हणून घ्या, अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. या अनोख्या आंदोलनाची कोल्हापुरात चर्चा रंगली.
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी मोर्चाला किती गर्दी होईल, याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोर्चाला मोठी गर्दी होईल, असा दावा केला होता. सोमवारी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोर्चात महिलांचाही सहभाग होता. हातात पायताण, विविध फलक आणि घोषणांच्या माध्यमातून आंदोलकांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. ‘गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा’ असे संदेश देणारे बॅनरही लक्ष वेधून घेत होते. समविचारी आघाडीचे नेतेही आंदोलनस्थळी उपस्थित होते.










