नाशिक वृत्तसंस्था – नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर राज्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोप करत, आता त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.
निदा खान हिला नाशिकमधून मुंब्र्यात आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. जवळपास ३५ दिवस तिला मदत करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी इम्तियाज जलील असून मतीन पटेल हा केवळ मोहरा होता, असा दावा शिरसाट यांनी केला. जलील यांच्या आदेशानुसार निदा खानच्या कुटुंबीयांशी संवाद साधला जात होता. पोलिसांनी व्हॉइस मेसेज आणि कॉलचे नमुने तपासल्यानंतर आवाजाचे नमुने जुळल्याने गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही भागांत धर्मांतराच्या टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलीस बारकाईने तपास करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासाचे कौतुक करत शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना तुरुंगात जावे लागेल, असा दावाही केला. त्यामुळे या प्रकरणातील पुढील पोलीस कारवाईकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










