मुंबई, वृत्तसंस्था : फ्युचर ग्रुपचे संस्थापक किशोर बियाणी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ची ९०४.३२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फ्युचर रिटेल लिमिटेड, संस्थापक किशोर बियाणी आणि संचालक राकेश बियाणी यांच्यासह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सीबीआयच्या मुंबई पथकाने बियाणी कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणांसह कंपनीच्या मुंबईतील विविध कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
एसबीआयच्या स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखेने दिलेल्या तक्रारीनुसार, फ्युचर रिटेलने एसबीआयसह नऊ बँकांच्या समूहाकडून वर्किंग कॅपिटल, टर्म लोन आणि लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाचा मंजूर उद्देशासाठी वापर न करता बियाणी यांच्याशी संबंधित इतर कंपन्या आणि संस्थांकडे निधी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. बँकेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार, बनावट लेखा नोंदी आणि कंपनीची खरी आर्थिक स्थिती लपवण्यासारख्या बाबी समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एसबीआयने २३ मार्च २०२६ रोजी फ्युचर रिटेलचे खाते अधिकृतपणे फसवणूक म्हणून घोषित केले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी एफआयआर नोंदवला. किशोर बियाणी, राकेश बियाणी, कंपनीचे व्यवस्थापकीय व कार्यकारी संचालक, जामीनदार तसेच काही अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक यासंबंधीच्या कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील छापेमारीदरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून सीबीआयकडून पुढील तपास केला जात आहे. ९०४.३२ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणामुळे उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.








