---Advertisement---

प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाची हत्या; माजी नगराध्यक्षासह एकाला अटक

By team
On: November 5, 2026 12:31 PM
Follow Us:
---Advertisement---

धाराशिव, वृत्तसंस्था : तुळजापूर शहरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून १८ वर्षीय समीर जब्बार पटेल या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अरबाज अफसर सय्यद हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. ३ नोव्हेंबर रोजी परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर त्याला काही जणांनी सोबत नेले. दरम्यान, अरबाजला चहा पित असताना जबरदस्तीने वाहनात बसवून शेतात नेण्यात आले. तेथे मोबाईलचा पासवर्ड घेऊन तपासणी करण्यात आली. मोबाईलमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नसतानाही त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मुलींचा पाठलाग करून त्रास देत असल्याचा आरोप करत आरोपींनी दोघांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

यानंतर समीरला घटनास्थळी बोलावून १५ ते २० जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला. तर अरबाजलाही मृत समजून भारतीयबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी समीरला मृत घोषित केले.

समीरच्या आईच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कदम आणि संजय जाधव यांना अटक करण्यात आली असून प्रणव देवकते, मस्के आणि अन्य दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेत वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!