अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : जिल्हा परिषद सदस्य प्रवीण दत्तात्रय तानवडे यांनी माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या समवेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन मतदारसंघातील आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. शिरवळ व वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खैराट आणि बादोला बुद्रुक येथील उपकेंद्रांच्या इमारतींची अवस्था खराब झाली असून, या इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
या चारही ठिकाणच्या इमारतींचे सुशोभीकरण आणि अंतर्गत दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांच्या इमारती सुस्थितीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका तानवडे यांनी मांडली. या मागणीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली. यावेळी महेश साठे, मनीष काळजे, चरण चवरे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.











