---Advertisement---

SIR प्रक्रियेतून वगळलेल्या मतदारांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी !

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गैरहजर, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंद अशा कारणांमुळे ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, तसेच ज्यांचे गणना अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा मतदारांना पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, अशा मतदारांना नव्याने फॉर्म ६ आणि फॉर्म ८ भरण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून SIR प्रक्रियेवरून विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावरही विरोधकांनी टीका केली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने वगळण्यात आलेल्या मतदारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याने या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

फॉर्म ६ आणि ८ भरण्याची सक्ती नाही

निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशांनुसार, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती नोंदवण्याच्या निर्धारित मुदतीपर्यंत संबंधित मतदारांना पुन्हा नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना पुन्हा नोंदणीची संधी दिली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र अर्जासोबत जोडपत्र (अ‍ॅनेक्स्चर) सादर करावे लागणार आहे. त्यामध्ये यापूर्वी गणना अर्ज का सादर करता आला नाही, याचे कारण स्पष्ट करावे लागेल. तसेच नवीन नोंदणीसाठी फॉर्म ६ भरलेला नसल्याचे घोषणापत्र द्यावे लागणार आहे.

ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष अर्ज करता येणार

संबंधित नागरिकांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) अथवा बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे अर्ज सादर करता येईल. ज्या मतदारांनी स्थलांतर केले आहे, त्यांना पूर्वीचा आणि सध्याचा पत्ता यांची माहिती द्यावी लागेल. तसेच सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा पुरावाही सादर करावा लागणार आहे.

अनेक राज्यांतील मतदारांना लाभ

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, नागालँड, हरियाणा आणि दिल्लीतील मतदारांसाठी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याची माहिती आहे. SIR प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी, स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे मतदार यादीतून नाव वगळले गेलेल्या नागरिकांना यामुळे पुन्हा संधी मिळणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत आपले नाव कायम ठेवण्यासाठी संबंधित नागरिकांनी निर्धारित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!